Tuesday 29 June 2021

आमदार कपिल पाटील मुंबई बंद पाडू शकतात?

 



मध्यंतरी आदरणीय अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांना भेटायला बोलावलं होतं. सोबत कपिल पाटील सर सुद्धा होते. 

तेव्हा उद्धवजींना बाळासाहेब, 'बंद यशस्वी करण्यात मदत करा' असं म्हणाले. 

त्यावर उद्धवजी म्हणाले, 'कपिलला सांगा तो मुंबई बंद पाडेल!'

कसं ते उद्धवजींनी बाळासाहेबांना सांगितलं.

 खरं तर उद्धवजींच्या अशा बोलण्याला मोठी पार्श्वभूमी होती. मध्यंतरी तीन मोठ्या आंदोलनाने मुंबई ठप्प झाली होती. बेस्ट आंदोलन, महापालिका कर्मचारी आंदोलन, रिक्षा-टॅक्सी आंदोलन. ही आंदोलनं कामगारांचे नेते दिवंगत शरद राव यांच्या युनियनने म्हणजेच आता सगळं काम पाहत असणाऱ्या शशांक राव, रंगा सातवसे, रमाकांत बने आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली होती. तेव्हा सरकार युतीचं होतं. बेस्ट कामगारांचा संप तर अनेक दिवस सुरू होता. मुंबईची दुसरी लायफलायन बेस्ट बंद होती. मुंबईकरांचा रोष वाढत चालला होता आणि आंदोलनाला पाठिंबा पाहून सत्ताधाऱ्यांचे धाबे दणाणले होते. पालिकेतील सत्ताधारी ऐकायला तयार नव्हते. तेव्हा यातला एक महत्चाचा दुवा ठरले आमदार कपिल पाटील. कपिल सर या युनियनचे प्रमुख सल्लागार आहेत. अनेक वर्षे कामगारांची आंदोलनं - मोर्चे, बंद त्यांनी जवळून पाहिले आणि हाताळले आहेत. याचा गाढा अनुभव पाठीशी होता. शेवटी सत्ताधाऱ्यांना नमाव लागलं आणि मागण्या मान्य कराव्या लागल्या. या वाटाघाटीत कपिल पाटील यांनी महत्वाची जबाबदारी पार पाडली. तेव्हा उद्धवजींना कळालं कपिल पाटील काय करू शकतात. सोबतच मुंबईतले शिक्षक आणि शिक्षक भारती संघटना (एकमेव शासन मान्य संघटना) यांनी जर ठरवलं तर सर्व शाळा सुद्धा कपिल सरांच्या एका हाकेवर बंद होऊ शकतात हे सुद्धा त्यांना चांगलं ठाऊक होतं.

आमदार कपिल पाटील मुंबई शिक्षक मतदार संघातून सलग तीन वेळेस मोठ्या मताधिक्याने निवडून येत आहेत. हा मतदार संघ यापूर्वी भाजप - संघाच्या ताब्यात होता. भाजपला हरवणं शिवसेनेसह सर्वच पक्षांना जमलं नाही. ते काम कपिल पाटील यांनी करून दाखवलं आणि ते सातत्य आजही आहे.

८ फेब्रुवारी २०२० रोजी वडाळाच्या स्पोर्ट कॉम्प्लेक्स स्टेडियम येथे कपिल पाटील यांच्या नेतृत्वात शिक्षकांचा राज्यस्तरीय मेळावा झाला. मैदानाच्या आत बाहेर गर्दी ओसंडून वाहत होती. शरद पवार आणि संजय राऊत या मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. आपल्या भाषणात संजय राऊत म्हणाले, 'आम्हाला वाटत होतं, मैदानं फक्त आम्ही शिवसेनेवालेच भरवू शकतो. पण कपिल पाटीलही मैदान भरवून दाखवू शकतात, मुंबई सारख्या ठिकाणी प्रचंड सभा घेऊ शकतात, हे आज त्यांनी दाखवून दिलं.'

कपिल पाटील सर काय करू शकतात हे उभ्या महाराष्ट्राने पाहिलंय आणि पुढेही बघतील. कपिल सरांच्या आमदारकीला 15 वर्ष पूर्ण होताहेत. त्यांचे अभिनंदन आणि भावी वाटचालीस शुभेच्छा!


- अ‍ॅड. सचिन बनसोडे,

राज्य संघटक, छात्रभारती विद्यार्थी संघटना, महाराष्ट्र राज्य 


#कार्यकर्ताआमदारकपिलपाटील 

#कपिलपाटीलआमदारकीची१५वर्ष