Wednesday 5 February 2020

समर्थांच्या दरबारी गुंडागिरी खपवून घेणार नाही


अक्कलकोट मधील घटना आहे. काही दिवसांपूर्वी पत्रकार स्वामिनाथ हरवाळकर यांना स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे ट्रस्टी जन्मेजय भोसले यांच्याकडून मारहाण झाल्याचा आरोप आहे. पहिल्यांदा मी अशा कोणत्याही हिंसेचं समर्थन करणार नाही, मारहाणीचा निषेध करतो.

हरवळकर यांची बाजू घेण्याचा मुद्दा नाही. त्यांच्या चुकांचं समर्थन अजिबात नाही. त्यांनी काही चुकीचं केलं असेल तर त्यांच्यावर कायद्याच्या मार्गाने कारवाई झालीच पाहिजे. त्यासाठी या देशात कायदा अस्तित्वात आहे. जन्मेजय भोसले यांच्या सांगण्यावरून गुंडांनकरवी झालेलं ही मारहाण आहे. पण म्हणून समग्र मराठा समाजाने अन्याय केला असं होतं नाही. आजपर्यंत कोणी एका व्यक्तीने दलित समाजावर वर अन्याय केला याचा अर्थ संपूर्ण मराठा समाजाला चुकीचं ठरवण्याचे सुद्धा कारण नाही. यामुळे विनाकारण दलित आणि मराठा समाजामध्ये दरी निर्माण होण्याचं कारण नाही आणि ते कोणी करत असेल तर चुकीचं आहे. रयतेचे राजे छत्रपती शिवराय आम्हाला नेहमीच वंदनीय आहेत. त्यांचं नाव घेऊन राजकारण करणाऱ्यांकडून अशाप्रकारचे अन्याय अपेक्षित नाहीत.

RTI च्या माध्यमातून माहिती मागितली म्हणून हरवाळकर यांना झालेल्या मारहाणीचेही समर्थन करता येणार नाही. बाबासाहेबांनी देशाला घटना दिली. सर्वांना समान अधिकार दिले. आपल्या देशाने लोकशाही स्विकारली. तेव्हापासून राजेशाही संपली. याची जाणीव बाबासाहेबांचं नाव घेऊन चळवळ आणि राजकारण करणाऱ्यांना असायला हवी. तुम्ही कोणाला राजा, महाराजा म्हणत असाल तर तुम्हाला बाबासाहेबांनी दिलेली लोकशाही मान्य नाही का? कुणाची तरी हुजुरीगिरी करताना. राज दरबारी तुझ्या पेक्षा माझी निष्ठा श्रेष्ठ याचा दिखावा करताना. आपण समाजाला बाबसाहेबांनी दिलेल्या अट्रोसिटीला विरोध करत आहोत याची जाणीवही या पुढाऱ्यांना राहिलेली नाही. अट्रोसिटी हा कायदा फक्त बौद्ध समाजासाठी मर्यादित नसून समस्त दलित वर्गासाठी आहे. आपल्याला आंबेडकरी चळवळीचे स्वरूप जर व्यापक बनवायचे असेल तर दलित या शब्दाखाली मोडणाऱ्या सर्व समाजाला सोबत घ्यावं लागेल. अन्यथा एकजातीय चळवळ जो काही आरोप आजवर आपल्यावर होत आली आहे तो यानिमित्ताने आणखीन घट्ट होईल.

अट्रोसिटी कायदा हे आपल्या समाज बांधवांसाठी संरक्षण आहे आणि तुम्ही जर गुन्हा नोंद करून घेऊ नका म्हणून मागणी करत असाल तर तुम्ही समाजाशी प्रतारणा करत आहात. अट्रोसिटी कायद्याचा अंमलबजावणीचे आकडे 5% च्या वर आपल्याला दिसणार नाहीत, असं असताना आपल्याच समाजातील पुढारीच जर देवाच्या आणि दानधर्माच्या नावाखाली अमाप संपत्ती कमावणाऱ्यांचे समर्थन करत असतील तर याचं खूप वाईट वाटतं. मी म्हणत नाही तुम्ही हरवळकर यांच्या पाठीशी उभं राहावं पण अत्याचार करणाऱ्यांचं समर्थन सुद्धा करू नका. अक्कलकोट मध्ये आंबेडकरी चळवळीचा झेंडा घेऊन जे कोणी माझे बांधव लढतायत ते खूप सक्षम आहेत, दिवसाची रात्र करून तुम्ही चळवळीचं काम करताय याची सुद्धा मला जाणीव आहे. परंतु आपण जी चळवळ चालवताय ते स्वाभिमानाचं प्रतीक असायला पाहिजे गुलामीच नव्हे. म्हणून त्यांनी स्वार्थासाठी कुणाला पाठिंबा न देता अन्यायाच्या विरोधात उभं राहिलं पाहिजे. चुकीच्या भूमिकांमुळे आपल्या संरक्षणाच्या असलेल्या कायद्याची जर चुकीचं चर्चा होत असेल तर जाहीररीत्या चर्चा घडवून आणणे सुद्धा आपलं कर्तव्य आहे. आपल्या समाजावर उच्चवर्णीय आणि सरंजामदारानी आजपर्यंत केलेला अन्याय अत्याचार विसरू नका. तुम्ही जर अशा परिस्थितीत अशी चुकीची भूमिका घेताय तर येणारा काळ तुम्हाला माफ करणार नाही. स्वतःच्या स्वार्थापोटी समाजाला वेठीस धरणे योग्य नाही.

बाकी कायद्यापुढे राजा आणि रंक सगळे सारखेच.

- अ‍ॅड. सचिन बनसोडे, कान्होळी, ता. अक्कलकोट
राज्य संघटक, छात्रभारती विद्यार्थी संघटना
bansodesachin358@gmail.com
9594827100

No comments:

Post a Comment