Sunday, 18 July 2021

महिला कारभारीण का नको?


बायको सरपंच आणि नवरा ग्रामपंचायतीचा खरा कारभारी, अशी स्थिती राज्यातल्या अनेक गावात आहे. आता मात्र ही परिस्थिती बदलणार आहे. कारण महिला सरपंचाचा नवरा किंवा तिच्या नातेवाईकांना ग्रामपंचायत कार्यालयास बसण्यास मनाई करण्यात आलीय. राज्यसरकारच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे. आपण सुद्धा या निर्णयाचे खुल्या मनाने स्वागत करून तो स्वीकार केला पाहिजे.

आपल्या महिला-भगिनींना राजकीय आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये 50% मिळालं हे खरंय परंतु त्याची अंमलबजावणी होईल की नाही याबद्दल तेव्हापासून शंका व्यक्त केली जात होती. त्याचं मुख्य कारण होत ते म्हणजे महिला निवडून येईल पण कारभार मात्र तिच्या पतीकडे, वडिलांकडे, भावाकडे (पुरुषांकडे) राहील. आधीसुद्धा आणि 50% आरक्षण मिळाल्यानंतर सुद्धा परस्थिती हीच होती ती आता सुद्धा सर्व ठिकाणी असावी. काही ठिकाणी अपवाद असेल जिथे महिला स्वतःहुन सक्षमपणे सत्ता चालवत असतील पण बहुतांश ठिकाणी मात्र त्यांना कारभार चालवायला स्वातंत्र्य दिली जात नाही ही बाब प्रकर्षाने जाणवते. सर्वांनी आपल्या मनाला प्रामाणिकपणे एकदा विचारा आपण त्यांना कधी निर्णयप्रक्रियेत सामावून घेतले का? किंवा स्वातंत्र्य दिलंय का? याचं उत्तर नाहीच असणार आहे.

ही बाब पुरोगामी महाराष्ट्राला कधीच शोभणारी नव्हती आणि नसेल. आपल्या महाराष्ट्राने देशाला विद्वत्ता दिली आहे. हा इतिहास आहे. आपल्या महाराष्ट्रात जिजाऊ, अहिल्याबाई, सावित्री- फातिमा बी, रमाबाई, ताराबाई शिंदे अशी असंख्य नावं घेता येतील. महाराष्ट्राने अशा कर्तृत्वान महिला दिल्या. त्या होत्या म्हणून तर आपल्या महिला शिकल्या घराबाहेर पडल्या. आज समाजात विविध पदांवर पोहचल्या आहेत.

परंतु राजकारणात मात्र आजही परिस्थिती बदलली नाहीये. कारण स्त्रियांना फक्त समोर करून निवडणुकीत जिंकवल जातं. निर्णयप्रक्रियेत मात्र त्या कुठेही नसतात ही फार मोठी शोकांतिका आहे. बरं ज्या घरात सुशिक्षित नाहीत अशा घरातली परस्थिती अपवाद असेल तर आपण समजू शकू मात्र सुशिक्षित घरात सुद्धा आज काय वेगळी परिस्थिती नाहीये. 

हा निर्णय माझ्या दृष्टीने यासाठी महत्त्वाचा वाटतो की पुरुषांचा हस्तक्षेप इतका वाढला आहे की आज त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी सरकारला निर्णय घ्यावा लागतो ही गंभीर बाब वाटते. यामधून आपण आता तरी शिकायला हवं आणि त्यांच्या हातात मोठ्या दिलाने कारभार देऊ आणि त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू. त्यांना कामात मदत करू मात्र हस्तक्षेप किंवा कारभार चालवणार नाही असा निर्णय घेऊ. अजूनही या निर्णयाची किती प्रमाणात अंमलबजावणी होईल याबाबत माझ्या सारख्या चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्याला शंका आहे. 

आपण आजही पुरुषसत्ताक मानसिकतेतून बाहेर पडलो नाही त्याउलट आणखीन कठोर होत गेलो. स्त्री सत्तेत असून सुद्धा तिला आज पुरुषसत्ताक सत्तेला त्याच्या मानसिकतेला हरवता आले नाही ही फार मोठी शोकांतिका आहे. आपण चळवळीत, समाजकारणात, राजकारणात काम करताना स्त्री मुक्तीच्या फार मोठ्या गप्पा मारतो मात्र प्रत्यक्षात तसं वागताना दिसत नाही. 

ते म्हणतात ना "स्त्री मुक्ती असावी मात्र त्यात माझी बायको नसावी" जणू अशी परस्थिती आपल्याला सगळीकडे दिसेल. ती बदलवायची असेल तर आपल्याला मन मोठं करावं लागेल कारण शेवटी आपण सुद्धा एका महिलेच्या पोटातून जन्म घेतलाय. तिच्या कर्तृत्वावर, निर्भयपणावर आणि धाडसावर आपण एकदा विश्वास ठेवू, ती कधी मागे हटणार नाही आणि कमी पडणार नाही याची खात्री मनी बाळगू.

मला वाटतं बाकी राज्याचं कसं होईल ठाऊक नाही मात्र याची सुरुवात आपल्या स्वतःपासून, घरापासून, आपल्या गावापासून करायला हवी. तेव्हा कुठे तरी आपण महिलांना खऱ्या अर्थाने सक्षम बनवण्यास एक पाऊल पुढे टाकू असं मला प्रामाणिकपणे वाटत. 

आपला, 
सचिन म. बनसोडे
9594827100
















----------------------

प्रसिद्धी -

मॅक्स महाराष्ट्र - https://bit.ly/3BgXXhR

Thursday, 1 July 2021

शालेय शिक्षणमंत्री आता तरी डोळे उघडतील काय?



गेल्या दीड वर्षापासून देशभरासह राज्यात कोरोनाचे सावट आहे. या कठीण काळात कामगार, छोटे व्यापारी, बेरोजगार तरुण, नोकऱ्या गेलेले तरुण अशा अनेक घटकांना याचा मोठा फटका बसला आहे.

शिक्षण क्षेत्र सुद्धा याला अपवाद नाही. गेल्या दीड वर्षांपासून शाळा, महाविद्यालय बंद आहेत. अजूनही सुरू होण्याचे चिन्ह दिसत नाही. याकाळात ग्रामीण भाग, झोपडपट्टी, वाड्या-वस्तीत, आदिवासी भाग, डोंगर-दऱ्यात शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. अनेक विद्यार्थी शाळा,कॉलेजातून गळाले आहेत. ड्रॉप आऊटच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. अशा मुलांच्या शिक्षणाचं काय? अनेकांच्या पालकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत त्या मुलांच्या शिक्षणाचं काय?

कोरोनात असे खूप प्रश्न आपल्यासमोर उभे आहेत, मात्र आपण हवालदिल आहोत. सरकार हातावर हात ठेवून गप्प आहे. वर्षभरापासून मागणी होतेय शिक्षण क्षेत्रात सवलती देण्याबाबत. सरकार मात्र जाणूनबुजून दुर्लक्ष करतंय.

यात एक चांगली बातमी काल राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली, त्यांचे आभार!

पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांची पुढील पूर्ण उच्च शिक्षणाची फी माफीची घोषणा त्यांनी केली. सोबतच सर्व प्रकारच्या फी मध्ये 50% सूट दिली आहे.

आमची तर मागणी होती सरसकट फी माफ करावी. परंतु उच्च व तंत्र शिक्षणमंत्री यांनी किमान दिलासा तर दिलाय.

शालेय शिक्षण खातं मात्र अजूनही मूग गिळून गप्प आहे. शालेय शिक्षणाचा बट्याबोळ झालाय. परीक्षेची फी भरायला पैसे नाहीत म्हणून १०वी आणि १२वी परीक्षेचे फॉर्म भरू न शकलेल्या विद्यार्थ्यांची संख्या २ लाख ३० हजाराहून अधिक आहे. तर ९वीतच बाद झालेल्या मुलांची संख्या १ लाख ४ हजार आहे. ऑनलाईन शाळांच्या नावाखाली अनेक पालकांना लुटलं जातंय. ३५ टक्क्यांहून अधिक विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणाच्या बाहेर आहेत. ऑनलाईन शिक्षणाची सुविधा नाही म्हणून राज्यात तीन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, ही आपल्या सर्वांसाठी वेदना देणारी बाब आहे. तरीही शालेय शिक्षणमंत्री केवळ आदेश देताना दिसत आहेत मात्र निर्णय काही घेत नाहीत. त्यांना काँग्रेस पक्षाच्या कामातून मुलांकडे बघायला वेळ नाहीये. फी माफी बाबत केवळ घोषणाबाजी करतात मात्र निर्णय घ्यायला तयार नाहीत. फी माफ करा म्हणून पालक संघटनांनी कोर्टाचं दार ठोठावलं आहे. दुसरीकडे सुप्रीम कोर्ट म्हणतंय फी घेऊ नका. पालकांना दिलासा द्या. तरीही अद्याप निर्णय नाहीच.

भाजपने मागील 5 वर्षात शिक्षणाची वाट लावली. महाविकास आघाडीचं सरकार आलंय लोकांच्या त्यांच्याकडून अपेक्षा आहेत. मात्र यांच्या अजेंड्यावर शिक्षणच  दिसत नाहीये.

शिवसेनेचे मंत्री असून सुद्धा उदय सामंत विद्यार्थ्यांसाठी निर्णय घेऊ शकतात मग काँग्रेसचे शालेय शिक्षणमंत्री का नाही निर्णय घेत? गांधी-नेहरूंचा काँग्रेस पक्ष कोणत्या वाटेवर चाललाय?  हा खरा प्रश्न आहे. काँग्रेसकडे आजही लोकं अपेक्षेने  पाहत आहेत. मागील पाच वर्षात मात्र जनतेने धडा शिकवून त्यांना सत्तेपासून लांब केलं होतं. आणि आता पुन्हा सत्ता आली तर जनतेचं भलं करायचं सोडून जनतेचे अतोनात नुकसान होताना दिसताहेत. भाजपने उघडपणे मागच्या पाच वर्षात शिक्षणाचा बट्याबोळ केला आणि आताचे मात्र तोंड बंद ठेवून शिक्षणाची वाट लावतायत हे भयानक आहे. त्यामुळे राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री आतातरी डोळे उघडतील काय?

- अ‍ॅड. सचिन बनसोडे
राज्य संघटक, छात्रभारती विद्यार्थी संघटना, महाराष्ट्र राज्य. 



Tuesday, 29 June 2021

आमदार कपिल पाटील मुंबई बंद पाडू शकतात?

 



मध्यंतरी आदरणीय अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांना भेटायला बोलावलं होतं. सोबत कपिल पाटील सर सुद्धा होते. 

तेव्हा उद्धवजींना बाळासाहेब, 'बंद यशस्वी करण्यात मदत करा' असं म्हणाले. 

त्यावर उद्धवजी म्हणाले, 'कपिलला सांगा तो मुंबई बंद पाडेल!'

कसं ते उद्धवजींनी बाळासाहेबांना सांगितलं.

 खरं तर उद्धवजींच्या अशा बोलण्याला मोठी पार्श्वभूमी होती. मध्यंतरी तीन मोठ्या आंदोलनाने मुंबई ठप्प झाली होती. बेस्ट आंदोलन, महापालिका कर्मचारी आंदोलन, रिक्षा-टॅक्सी आंदोलन. ही आंदोलनं कामगारांचे नेते दिवंगत शरद राव यांच्या युनियनने म्हणजेच आता सगळं काम पाहत असणाऱ्या शशांक राव, रंगा सातवसे, रमाकांत बने आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली होती. तेव्हा सरकार युतीचं होतं. बेस्ट कामगारांचा संप तर अनेक दिवस सुरू होता. मुंबईची दुसरी लायफलायन बेस्ट बंद होती. मुंबईकरांचा रोष वाढत चालला होता आणि आंदोलनाला पाठिंबा पाहून सत्ताधाऱ्यांचे धाबे दणाणले होते. पालिकेतील सत्ताधारी ऐकायला तयार नव्हते. तेव्हा यातला एक महत्चाचा दुवा ठरले आमदार कपिल पाटील. कपिल सर या युनियनचे प्रमुख सल्लागार आहेत. अनेक वर्षे कामगारांची आंदोलनं - मोर्चे, बंद त्यांनी जवळून पाहिले आणि हाताळले आहेत. याचा गाढा अनुभव पाठीशी होता. शेवटी सत्ताधाऱ्यांना नमाव लागलं आणि मागण्या मान्य कराव्या लागल्या. या वाटाघाटीत कपिल पाटील यांनी महत्वाची जबाबदारी पार पाडली. तेव्हा उद्धवजींना कळालं कपिल पाटील काय करू शकतात. सोबतच मुंबईतले शिक्षक आणि शिक्षक भारती संघटना (एकमेव शासन मान्य संघटना) यांनी जर ठरवलं तर सर्व शाळा सुद्धा कपिल सरांच्या एका हाकेवर बंद होऊ शकतात हे सुद्धा त्यांना चांगलं ठाऊक होतं.

आमदार कपिल पाटील मुंबई शिक्षक मतदार संघातून सलग तीन वेळेस मोठ्या मताधिक्याने निवडून येत आहेत. हा मतदार संघ यापूर्वी भाजप - संघाच्या ताब्यात होता. भाजपला हरवणं शिवसेनेसह सर्वच पक्षांना जमलं नाही. ते काम कपिल पाटील यांनी करून दाखवलं आणि ते सातत्य आजही आहे.

८ फेब्रुवारी २०२० रोजी वडाळाच्या स्पोर्ट कॉम्प्लेक्स स्टेडियम येथे कपिल पाटील यांच्या नेतृत्वात शिक्षकांचा राज्यस्तरीय मेळावा झाला. मैदानाच्या आत बाहेर गर्दी ओसंडून वाहत होती. शरद पवार आणि संजय राऊत या मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. आपल्या भाषणात संजय राऊत म्हणाले, 'आम्हाला वाटत होतं, मैदानं फक्त आम्ही शिवसेनेवालेच भरवू शकतो. पण कपिल पाटीलही मैदान भरवून दाखवू शकतात, मुंबई सारख्या ठिकाणी प्रचंड सभा घेऊ शकतात, हे आज त्यांनी दाखवून दिलं.'

कपिल पाटील सर काय करू शकतात हे उभ्या महाराष्ट्राने पाहिलंय आणि पुढेही बघतील. कपिल सरांच्या आमदारकीला 15 वर्ष पूर्ण होताहेत. त्यांचे अभिनंदन आणि भावी वाटचालीस शुभेच्छा!


- अ‍ॅड. सचिन बनसोडे,

राज्य संघटक, छात्रभारती विद्यार्थी संघटना, महाराष्ट्र राज्य 


#कार्यकर्ताआमदारकपिलपाटील 

#कपिलपाटीलआमदारकीची१५वर्ष